पुणे – कोरोनासंबंधी (Corona) राज्यातील ३०० गोशाळांमध्ये सर्वेक्षण (Goshala Survey) करण्यात आले. यापैकी २९२ गोशाळांमध्ये काम करणाऱ्या एकालाही कोरोना झाला नसल्याचे पुणे महानगर गोसेवा समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कोरोना काळात दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली का, हे जाणून घेण्यासाठी पुणे महानगर गोसेवा समितीच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीबाबत समितीच्या कसबा भागाचे संयोजक गिरीश वैकर म्हणाले, ‘‘या ३०० गोशाळांमध्ये दैनंदिन देशी गायीच्या संपर्कात असणाऱ्या एकूण एक हजार ८९५ लोक होती. त्यापैकी केवळ १४ लोकांनाच कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले.
विशेष म्हणजे यातील बहुतेक जण कामानिमित्त बाहेर जात होते. तसेच गोशाळांच्या आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आठ गोशाळांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एखाद-दुसऱ्या कामगाराला कोरोना झाल्याचे सांगितले. देशी गायींच्या संपर्कात असलेल्या ९९.२७ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे या सर्वेक्षणातून समजले.’
देशात आणि परदेशात गोमुत्रावर मोठे संशोधन झाले आहे. आपल्या देशाला या संशोधनात देशी आणि अमेरिकन अशी सहा पेटंट मिळालेली आहेत. गोशाळेत या लोकांचा दररोज गोमय आणि गोमुत्राशी संपर्क येतो. गोमूत्रामध्ये व्होलाटाइल ऑरगॅनिक आणि फेनॉलिक कंपाउंड असल्यामुळे ते अँटिव्हायरल डीसइन्फेक्टन्ट कम सॅनिटायझर म्हणून काम करत असावीत. त्यामुळेच यातील बहुतांश लोकांना लागण न झाल्याचे शक्यता आहे.
– डॉ. प्रमोद मोघे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ (निवृत्त), राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे
राज्यातील तीनशे गोशाळांमधून १८ वेगवेगळ्या प्रश्नावलीच्या माध्यमातून विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. बहुतांश लोकांनी कोरोनाचा त्रास झाला नसल्याचे सांगितले. त्याचे शास्त्रीय पातळीवरही परिणाम तपासण्यात आले.
– निरंजन गोळे, सहसंयोजक, पुणे महानगर गोसेवा समिती, कसबा भाग